कळंब (प्रतिनिधी)- व्यसनाने विविध प्रकारचे शारिरीक, मानसिक नुकसान तर होतेच परंतु समाजात गेलेली प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. वास्तविक चुकीच्या संगतीमुळे अनेकजण व्यसनाच्या आहारी जातात. त्यातून त्यांचे जीवनच चुकीच्या वाटेवर झुकते. मात्र अशा चुकीच्या वाटेवर गेलेल्यांना पुन्हा पहिल्या वाटेवर आणता येते त्यासाठी गरज असते ती योग्य विचारांची आणि वेळेवर होणार्या मार्गदर्शनाची. हेच काम उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील कोथळा या गावातून पुढे आलेला एक उमदा तरूण मोठ्या उत्साहाने करतो आहे.
आशिष निवृत्ती झाडके असे त्याचे नाव…औरंगाबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यशास्त्र व योग विभागात शिक्षण पूर्ण केल्यानंतरही आशिषने आपल्या आवडी मनापासून जपल्या. आज तो नृत्य, नाट्य आणि योग प्रशिक्षक म्हणून उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यात चांगले कार्य करतो आहे. योगाच्या माध्यमातून शारिरीक पातळीवर येणारे संतुलन आणि त्यातून व्यसनापासून होणारी सुटका याचे महत्व तो पटवून देतो. वास्तविक व्यसनाच्या आहारी जाणे हे मुळातच चुकीचे मग ते व्यसन कोणतेही असो. नैराश्यातून अनेकदा माणूस व्यसनाच्या पहिल्या टप्प्यात ओढला जातो. मात्र हीच सवय त्याच्यासह त्याच्या कुटूंबियाची वाताहत करण्यास कारणीभूत ठरते.
अशा व्यसनाधिन व्यक्तीला त्याच्या चुकीच्या जीवनशैलीपासून दूर करण्यासाठी गरज असते ती योग्य प्रबोधनाची कळंब तालुक्यातील येरमाळा येथे येडाई व्यसनमुक्ती केंद्र व बार्शी तालुक्यातील जामगाव येथील आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्र कार्यरत आहे. या केंद्रात आशिष झाडके हा तरूण अनेकांना नृत्य, नाट्य आणि योग प्राणायमाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी प्रवृत्त करतो आहे. त्याचे हे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी तर ठरलेच आहे. परंतु अनेकांना व्यसनमुक्त करण्यासाठी महत्वाचे माध्यम ठरले आहे. व्यसन सुटण्यासाठी त्या व्यक्तीमध्ये परिवर्तनाची आवश्यकता असते. याच हेतूने अध्यात्मिक विचारांबरोबरच स्वतः स्थापन केलेल्या फ्यूजन डान्स अकॅडमीच्या माध्यमातून नृत्याचे धडे दिले आहेत. ते काम करत असलेल्या येडाई व्यसनमुक्ती केंद्रात व आयुष व्यसनमुक्ती केंद्र शेकडो तरूण येत असतात. प्रत्येकाचे कारणे वेगवेगळी असतात त्यातूनच ते व्यसन करत असतात. त्यामुळे त्यांचे कुटूंबिय हतबल असते अशा कुटूंबियाला येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे डॉ.संदिप तांबारे हे मार्गदर्शन आणि योग्य ते उपचार करत असतात.
दरम्यान व्यसनामुळे आलेले नैराश्य झटकण्यासाठी अशा व्यक्तींना जीवनाचा आनंद समजवण्यासाठी संगीत, नृत्य, नाट्य आणि गायन, योगा व संयमाची आवश्यकता असते हीच कला त्यांच्या आत्मसात करण्यासाठी आशिष झाडके हा तरूण मोठ्या हिरारीने काम करतो आहे. त्यामुळे त्याचे कौतुक होत आहे.