हिंगोली- महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील अष्टीकर यांच्या प्रचारापासून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर व आमदार प्रज्ञाताई सातव हे दूर असल्याची चर्चा झडू लागल्यानंतर संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी यशस्वी खेळी करून दोन्हीही नेत्यांना प्रचारात उतरविले आहे. नुकतेच दांडेगावकरांनी अष्टीकरांसाठी पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेतली तर प्रज्ञाताई सातव यांनी थोरात यांना शब्द देऊन प्रचारात
महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी आपल्या प्रचाराचा धडाका लावला आहे. दुसरीकडे आघाडीतील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर व काँग्रेसच्या आमदार प्रज्ञाताई सातव हे आष्टीकर यांच्या प्रचारापासून दूर असल्याची चर्चा रंगू लागली होती. याबाबत शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी तातडीने सूत्र हलवून दोन्ही नेत्यांना प्रचारात उतरण्यासाठी यशस्वी शिष्टाई केली. जयप्रकाश दांडेगावकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन नागेश पाटील आष्टीकर यांच्यासाठी जोरदार प्रचार करण्याचे आवाहन केले. वसमत विधानसभा मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार म्हणून अष्टीकर यांना सर्वाधिक मताधिक्य देऊ असे देखील त्यांनी जाहीर केले. पाठोपाठ संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी सोमवारी आमदार प्रज्ञाताई सातव यांच्या निवासस्थानी भेट घेऊन निवडणुकीतील घडामोडींची माहिती दिली. यानंतर प्रज्ञाताई सातव यांनी उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारात उतरणार असल्याचे जाहीर केले. दिवंगत खासदार राजीव सातव यांना मानणारे सर्व काँग्रेस कार्यकर्ते आष्टीकर यांच्यासाठी एकजुटीने काम करतील आणि हिंगोली लोकसभेवर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
दांडेगावकर आणि सातव यांच्या मैदानात उतरण्यामुळे आघाडीतील उणिवा संपल्या असून अष्टीकरांचे पारडे जड ठरत आहे. संपर्कप्रमुख थोरात यांच्या या राजकीय खेळीमुळे निवडणुकीचा कौल बदलला आहे.