हिंगोली (जिमाका), दि. 30 : हिंगोली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया वेग घेत असून, आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दूरदृष्यप्रणालीद्वारे मतदारसंघातील सर्व सहायक निवडणूक अधिकारी तथा पथकप्रमुखांकडून टपाली मतपत्रिकांचा आढावा घेतला.
अपर जिल्हाधिकारी तथा पथक प्रमुख खुशालसिंह परदेशी, जिल्हा सांख्यिकी एस. एम. रचावाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, तहसीलदार नवनाथ वगवाड, पोलीस निरीक्षक व्ही. टी. गुट्टे हे प्रत्यक्ष तर दूरदृष्यप्रणालीद्वारे मतदारसंघातील सर्व सहायक निवडणूक अधिकारी उपस्थित होते.
टपाली आणि इलेक्ट्रॉनिकली टपाली मतपत्रिका प्रणालीबाबत आढावा घेतना जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. पापळकर यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये मतदारसंघातील ज्येष्ठ मतदार, दिव्यांग मतदारांच्या संख्या पुन्हा तपासून त्याची सुधारित यादी येत्या 4 एप्रिलपर्यत पाठविण्याचे निर्देश दिले.
अत्यावश्यक सेवेतील वाहक व चालकांबाबत मतदान केंद्रांवर जाणाऱ्या बससाठी नमुना 12 अ तर जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या बसचे वाहक – चालकांसाठी नमुना 12 डी द्यावा. तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील, पोलीस अधिकारी –कर्मचारी, बाहेर जिल्ह्याचे निवडणूक कर्तव्यावर असणारे अधिकारी –कर्मचारी मतदारांबाबतही अशीच कार्यवाही करण्याच्या सहायक निवडणूक अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना सूचना दिल्या.
बाहेर जिल्ह्यातील निवडणूक कर्तव्यावर असणारे अधिकारी –कर्मचारी यांना नमुना 12 वितरीत करणे, विधानसभा निहाय यादी तयार करून वेगवेगळे लखोटे तयार करणे व ते सर्व एका लखोट्यात सहा मतदारसंघाचे सहा लखोटे टाकणे, हे सर्व लखोटे जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या.
हदगाव, किनवट, उमरखेड आणि वसमत या विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी टपाली मतपत्रिका उपकोषागार कार्यालयात ठेवण्याचे प्रस्ताव या कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सहायक निवडणूक अधिकारी यांनी नमुना 12 अ ला अनुक्रमांक देणे, विधानसभा मतदार संघनिहाय अर्जाची विभागणी करून ते स्वतंत्र सीलबंद लिफाफ्यात ठेवून संबंधित विधानसभा मतदार संघाकडे पाठविण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधितांना यावेळी दिल्या.