कंधार (मुरलीधर थोटे)
गेल्या एक महिन्यापासून बस कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने एकही बस रस्त्यावर दिसून येत नाही.याचा फटका तालुक्यातील शाळा महाविद्यालया आणि खाजगी शिकवणी वर्गासाठी जवळपास दीड दोन हजार एस.टी. पासधारक विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी जीव मुठीत धरून जीवघेणा प्रवास करावा लागतो. सदरचे विद्यार्थी बस प्रवासापासून वंचित असल्याने विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये ये-जा करण्यासाठी पालकांना अव्वाच्यासव्वा दैनंदिन खर्चाचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे पालक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मागील दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे नैसर्गिक आपत्ती उद्भवल्याने या महामारीपासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊनच्या माध्यमातून शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.त्यामुळे यातून विध्यार्थ्यांना शैक्षणिक जडणघडणीचा प्रवास अवघड झाला आहे. यातच आता कोरोना, डेल्टापासून सावरत शासनाने शाळा-कॉलेज उघडण्यास परवानगी दिली आहे. बराच कालावधीची विश्रांती घेतलेल्या शालेय विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्याची ओढ लागल्याचे दिसून येत आहे. त्यातच ‘दुष्काळात तेरावा महिना !’ म्हटल्याप्रमाणे शाळा कॉलेज सुरू झाले आणि ग्रामीण भागातून बसने सवलतीच्या दरात व मोफत प्रवास करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बस प्रवासापासून कोसो दूर झाले आहेत. या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना अवाच्या सवा तिकीट खर्च करून खाजगी वाहनातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. तर याचा नाहक आर्थिक त्रास पालकांना सोसावा लागत आहे.
कंधार बस आगार अंतर्गत माध्यमिक व उच्चमाध्यमिक मध्ये शिकणाऱ्या प्रवासी विद्यार्थीनींची संख्या हजारो असून या विद्यार्थीनींना अहिल्याबाई होळकर या नावाने मोफत प्रवासी बस पास दिला जातो. तर दीड दोन हजार विद्यार्थ्यांना दरमहा सवलतीच्या दरात पास दिला जातो. यात ग्रामीण भागातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दैनंदिन हातावर पोट घेऊन जगणारा मजूर हा आपल्या होतकरू पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी उधारी उसनवारी करून पाल्याच्या टिकीटासाठी तडजोड करीत असल्याचे चित्र ग्रामीणभागात दिसून येत आहे.
कंधार आगारातून प्रवास करणाऱ्या एकूण ६१ बस असून १३३ चालक व १३१ वाहक व इतर कर्मचाऱ्यांची संख्या वेगळी आहे. आज घडीला सर्वच बस आगारात शांतपणे उभ्या असून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा गलका मात्र चालू आहे. या बंद असलेले बसेसचा पुरेपूर फायदा अवैध प्रवासी वाहतूक करणारे प्रवासी वाहने घेत आहेत. यामुळे सुरक्षित अंतर ठेवा म्हणत प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी सेवा देणाऱ्या बस असल्यामुळे नाइलाजास्तव अवैध प्रवासी वाहनात स्वतःला कोंबून घेऊन आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. हे निश्चितच भविष्यात धोकादायक असल्याचे प्रवाशांमधून ऐकावयास मिळत आहे.
चौकट : सामाजिक आणि आर्थिक समतोल राखून राज्याच्या तिजोरीचा भार समतोल ठेऊन हा एस.टी कर्मचाऱ्यांचा संप राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एस.टी.कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विश्वासास पात्र राहून राज्यातील ग्रामीण भागातील प्रवाश्याना,विध्यार्थ्यांना आणि जेष्ठ नागरिकांना दिलासा देऊन एस.टी.चा प्रवास पुन्हा सुरू करणे हि आजच्या परिस्थितीशी निगडित राहील अशी भावना युवा शिवसैनिक परमेश्वर जाधव यांनी बोलताना सांगितले.